तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले आहे. मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. १७ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी व नायब तहसीलदार कार्यरत असून ७० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे ८ जवान व २ हवालदार कार्यरत असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतमोजणीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा परिसर सील करण्यात आला असून त्या ठिकाणी एक डीवायएसपी, दोन पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक, ३८ पोलीस, १५ होमगार्डचा ताफा कार्यरत राहणार आहे.
मिरवणूक काढण्यास बंदी...
विजयी उमेदवारांनी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. मतमोजणीसाठी १७ टेबलचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.