औराद शहाजानी : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे. यावर्षीही संचारबंदीमुळे शेतीमालाला बाजारपेठ भेटली नाही. परिणामी, लाखाे रुपये खर्च करून पिकवलेली फळबाग व भाजीपाला शेतातच सडला आहे. बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढत्या संसर्गामुळे राज्यात संचारबंदी लागू आहे. यासोबतच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व तेलंगणा या शेजारील राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे व्यापाऱ्यांना वेळेचे बंधन, फळविक्री व पालेभाज्या या सर्वांची मागणी व विक्री कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पालेभाज्या व फळे शेतातच सडत आहे. गेल्या वर्षी निलंगा तालुक्यात चांगला पाऊस झाला सर्व पाणी साठवण क्षेत्र भरले. परिणामी, या भागात उन्हाळी फळबागा व भाजीपाला लागवड क्षेत्र वाढले आहे. तालुक्यात दीड हजार हेक्टरवर भाजीपाला व एक हजार हेक्टरवर फळबाग लागवड या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी केली आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात कडक लाॅकडाऊन लागल्याने शेतातील उत्पादित झालेले टरबूज, खरबूज, द्राक्ष, आंबा, पपई, आदी फळबाग तसेच मिरची, शेवगा, वांगे, टोमॅटो आदी भाजीपाला ग्राहकाअभावी शेतकऱ्यांनी शेतात तोडणी न करता सोडून दिल्याने लाखोंचा शेतीमाल शेतात पडून आहे. औरादमधील उमाकांत भंडारे यांच्या शेतातील दोन एकरामधील ८० टन टरबूज व्यापार बंद असल्यामुळे शेतातच खराब झाले आहे. डाेंगरगाव येथील युवराज बिरादार यांचेही टरबूज पिकाचे नुकसान झाले आहे.
रमजान महिन्यातही यावर्षी विक्री नाही
शेतकरी भंडारे यांनी दोन एकरमध्ये लाखो रुपये खर्च करून उत्तम दर्जाचे टरबूज उत्पादित केलेले होते. ऐन लॉकडाऊनच्या कालावधीत काढणीस आल्यामुळे या टरबुजाला मागणी नसल्याने गावात फिरून विक्री केल्यानंतरही उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे उमाकांत भंडारे यांचा टरबूज शेतातच खराब झाले. डोळ्यासमोरच शेतातील टरबूज पूर्णपणे सडून जाणार असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
मिरची पिकाचेही मोठे नुकसान...
येथील युवा शेतकरी कन्हैया पाटील यांनीही एक एकरमध्ये हिरवी मिरची लागवड केली होती. आणी पीक जाेमात आले पण महाराष्ट्र पाठोपाठ कर्नाटकात व आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये लॉकडाऊन लागताच या मिरचीची मागणी थांबली. त्यामुळे ही मिरची झाडाला तशीच लागून वाळत आहे. त्याचप्रमाणे तगरखेडा येथील शेतकरी माधवराव थेटे, औराद येथील सुधाकर म्हेत्रे यांच्या शेतातील शेवगा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमालाची विक्री न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागले. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.