गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले. तसेच कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे काही जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. रोजगार नसल्याने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत उपवर झालेल्या मुलीच्या विवाहाची चिंता असते. विवाह समारंभ करणे सामान्य नागरिकांना कठीण झाले आहे.
गोरगरिबांच्या विवाह सोहळ्याला हातभार लागावा म्हणून तालुक्यातील शेंद उत्तर येथील परबत माने, गोविंद शेळके, लिंबराज माने आदी सहा युवकांनी अनोखा उपक्रम राबवित स्वखर्चाने संसारोपयोगी साहित्य भेट दिले आहे. गावातील पंडित कांबळे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी या युवकांनी स्वखर्चाने १० हजारांचे संसारोपयोगी साहित्य दिले आहे.
सामाजिक बांधिलकी...
कोरोनाच्या संकटामुळे रोजगार हिरावला गेल्याने दररोजच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शेंदच्या युवकांनी शासनाची कोणतीही मदत न घेता केवळ सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी स्वखर्चातून १० हजारांचे संसारोपयोगी साहित्य दिले. या उपक्रमाची तालुक्यात चर्चा होत आहे.