लातूर : शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करुन देतो म्हणून मुंबईतील दोघांनी लातुरातील एकास साडेचार लाख रुपयांना फसविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले, लातुरातील विवेकानंद चौकातील राहुल वैजनाथ राचट्टे हे व्यवसायाने व्यापारी आहेत. दरम्यान, आरोपी आदित्य पांडे व साईनाथ (रा. नवी मुंबई) यांनी संगनमत केले. या दोघांनी फिर्यादी राचट्टे यांना १७ जानेवारी २०२३ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत विश्वासात घेतले. शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करुन देतो, अशी हमी देत ४ लाख ५० हजार रुपये पाठविण्यास सांगितले.हे पैसे पाठविल्यानंतर ते कुठलाही प्रतिसाद देईनासे झाले. तेव्हा राचट्टे यांनी रक्कम परत मागितली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने राहुल राचट्टे यांनी विवेकानंद चौक पोलिसात धाव घेवून फिर्याद दिली. त्यावरुन शुक्रवारी रात्री मुंबईतील दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि. घारगे हे करीत आहेत.
पैसे दुप्पट करुन देतो म्हणत साडेचार लाखास फसविले
By हरी मोकाशे | Updated: July 22, 2023 21:16 IST