निलंगा तालुक्यातील केळगाव येथे ५३ हेक्टरवर वनीकरणाचे क्षेत्र आहे. त्यामध्ये सर्व्हे नंबर ९९ क या वन विभागाच्या क्षेत्रात सन २०१९-२०२० मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती.
मात्र, बुधवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये हजाराे वृक्ष खाक झाली आहेत. शासनाचे लाखो रुपये खर्च करून २ कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमांतर्गत वृक्षलागवड केली होती. मात्र,लागलेल्या आगीत ती खाक झाली असून, सदरची आग सायंकाळपर्यंत आटाेक्यात आण्याचे प्रयत्न सुरु हाेते. या आगीत हजारो झाडे-झुडुपे खाक झाल्याने शासनाचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीच्या लोळाने हरीण, मोर, रानडुक्करे वन सोडून जीव वाचवण्यासाठी जंगलातून पळ काढत हाेते. असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.
नुकसानीचा आकडा सांगता येणार नाही...
घटनेबाबत वन परिमंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले मी सध्या लातूरमध्ये आहे. आमचे कर्मचारी आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीमध्ये नेमके किती नुकसान झाले आहे, हे सांगता येणार नाही. याबाबतची माहिती सध्याला माझ्याकडे उपलब्ध नाही, असे वनपरिमंडळ अधिकारी म्हणाले.
आगीचा शेजारच्या शेतकऱ्यांना फटका...
प्रत्येक वर्षी वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वन विभागाच्या गावालगत असलेल्या माळावर आग लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतात ठेवलेला कडबा आणि पिकांना आगीचा धोका आहे. गतवर्षीही अशीच महावितरणची विद्युत तार तुटून पडल्याने आग लागली होती. आगीची पुनरावृत्ती दरवर्षी सुरुच आहे. प्रशासनाने याची दखल घेत, उन्हाळ्यात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवावे, असे केळगाव येथील शेतकरी विक्रम चव्हाण म्हणाले.
प्रशासनाने उपाययाेजना कराव्यात...
केळगाव परिसरात असलेल्या वनीकरणात हजाराे पशु, पक्ष्यांचे वास्तव्य आहे. दरवर्षी लागणाऱ्या आगीमुळे हजाराे झाडे, पक्षी हाेरपळून जात आहेत. याकडे संबंधित वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष हाेत आहे. याबाबत उपाययाेजना करुन आग लागणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. यातून वन्य जीव साप, हरीण, ससे यांचे संरक्षण हाेईल असे राठाेडा येथील प्राणीमित्र प्रबाेद पुरी म्हणाले.