हत्तीबेटाच्या उर्वरित क्षेत्रावर वृक्ष लागवडीस वनविभागाची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:19 AM2021-05-14T04:19:04+5:302021-05-14T04:19:04+5:30

उदगीर : मराठवाड्यातील ब वर्गीय पर्यटनस्थळ असलेल्या हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या उर्वरित शिल्लक क्षेत्रावर येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यास वन विभागाकडून ...

Forest Department avoids tree planting on the remaining area of Hattibeta | हत्तीबेटाच्या उर्वरित क्षेत्रावर वृक्ष लागवडीस वनविभागाची टाळाटाळ

हत्तीबेटाच्या उर्वरित क्षेत्रावर वृक्ष लागवडीस वनविभागाची टाळाटाळ

Next

उदगीर : मराठवाड्यातील ब वर्गीय पर्यटनस्थळ असलेल्या हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या उर्वरित शिल्लक क्षेत्रावर येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यास वन विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. दोन वर्षांत हत्तीबेटावर वनविभागाने एकही वृक्ष लागवड केली नाही. विशेष म्हणजे, हत्तीबेटाच्या देखभाल दुरुस्तीसाठीही वन विभागाने हात झटकले आहेत. त्यामुळे या यंत्रणेकडून हत्तीबेटाचे काम काढून अन्य यंत्रणेस जोडण्याची मागणी होत आहे.

हत्तीबेट पर्यटनस्थळाची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी जिल्हास्तरीय पर्यटन समितीने वन विभागाच्या ताब्यात हत्तीबेट दिले होते.

सन २०११-१२ साली प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत रोपवाटिका व बागबगिचा करण्यासाठी १६७.५० लाख व २०१३-१४ साली प्रतिबंधक चर खोदणे, जलसंधारणाची कामे, वृक्ष लागवड, रेलिंग, पेव्हर ब्लॉक, स्टोअर शेडसाठी ३२ लाखांचा निधी पर्यटन विभागाने मंजूर करून वन विभागाला दिला होता. वन विभागाने ही कामे थातूरमातूर व अर्धवट केल्यामुळे ही सर्व कामे दर्जेदारपणे पूर्ण करण्यासाठी ॲड. दत्ता पाटील, सभापती सत्यकला गंभीरे व व्ही. एस. कुलकर्णी यांनी वेळोवेळी मागणी करूनही त्याची चौकशी केली नाही.

वृक्ष लागवड २००९-१० सालीच

स्थानिक विकासासाठी प्रशासकीय मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. तत्कालीन पालकमंत्री दिलीपराव देशमुख, जिल्हाधिकारी एकनाथ डवले, अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांनी हत्तीबेटावर १ हजार २०० वृक्ष लागवड करण्यासाठी २१ लाखांचा निधी मंजूर केला होता. त्यातून वन विभागाने हत्तीबेटावर वृक्ष लागवड केली. पर्यटनाचा निधी वन विभागाच्या ताब्यात दिल्यामुळे वन विभागाने हत्तीबेटाची देखभाल दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. परंतु, या निधीतून खरेदी करण्यात आलेले साहित्य-सामग्री हत्तीबेटावर वन विभागाने आणले नाही. शिवाय, आणलेले साहित्य-सामग्री वन विभागाच्या दुर्लक्षामुळे चोरीस गेली.

हत्तीबेट पर्यटनस्थळास पर्यटनाचा ब दर्जा आहे. पर्यटन विकास महामंडळाकडून पर्यटन विकासासाठी निधी मिळणार होता. मात्र वन विभागाने विकासकामांच्या निधीची मागणी केलेली नाही. त्यामुळे हत्तीबेट विकासाला गेल्या सात वर्षांपासून कसलाही निधी मिळालेला नाही.

हत्तीबेट विकासाकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्यानंतर हत्तीबेटाची देखभाल या ठिकाणी सुरू असलेल्या रोपवाटिकेवरील मजुरांकडून करण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांपासूनही देखभाल सुरू आहे. मात्र २०११ ते १४ या वर्षात झालेल्या २ कोटींच्या कामांची चौकशी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजून केली नाही.

वृक्षारोपणही नाही, देखभालही नाही...

हत्तीबेटाच्या उर्वरित शिल्लक क्षेत्रावर येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात यावे व त्यासाठी ठिबक सिंचनाची सोयही करण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री संजय बनसोडे व देवर्जन ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता खटके व व्ही. एस. कुलकर्णी यांनी उस्मानाबादच्या विभागीय वन अधिकाऱ्यांकडे केली असता ऑगस्ट २०२१ नंतर वृक्षारोपण करण्यासाठी पाहू. हत्तीबेटावर पर्यटन विकासाची जी कामे केली जातील त्याचे संगोपन, देखभाल, परिरक्षण करण्यासाठी वन विभागाकडे निधीच उपलब्ध नाही, असे उस्मानाबादचे विभागीय वन अधिकारी एम.आर. गायकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे...

हत्तीबेट पर्यटनाचा विकास गेल्या सात वर्षांपासून ठप्प झाला आहे. सात वर्षांपासून विकासासाठी वन विभागाने निधीची मागणी केली नाही. त्यामुळे निधीही मिळालेला नाही. जिल्हास्तरीय पर्यटन समितीने हत्तीबेट वन विभागाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर सर्व जबाबदारी सोपविली होती. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी हत्तीबेटाला आल्यावरच येतात. त्यामुळे वन विभागाची यंत्रणा बदलून अन्य यंत्रणेकडे हत्तीबेटाची जबाबदारी सोपवावी, यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी लक्ष घालावे, अशी मागणी हत्तीबेटप्रेमी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Forest Department avoids tree planting on the remaining area of Hattibeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.