आजही तृतीयपंथी हा समाजातील उपेक्षित घटक आहे. त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हे नागरिकांसमोर हात पसरून भीक मागणे होय. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे दीड महिन्यापासून टाळेबंदी असल्याने येथील तृतीयपंथीयांचे हाल होत होते. प्रसंगी त्यांना उपाशीही राहावे लागत होते. मागील लॉकडाऊनच्या काळात काही जणांनी मदत केली होती. परंतु, सध्या कुणाचीही मदत मिळाली नसल्याचे तृतीयपंथी अंजली पटेल यांनी सांगून व्यथा मांडल्या होत्या.
यासंदर्भात ‘लोकमत’मधून १६ मे रोजी अगोदरच वंचित असलेल्यांना कोरोनाने केले आणखीन दूर या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. त्याची दखल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी घेऊन गोपाळ नगर भागातील तृतीयपंथीयांना मदत करण्याची सूचना केली. त्यानुसार सोमवारी तहसीलदार रामेश्वर गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन गहू, तांदूळ, गोडेतेल, शेंगदाणे, जिरे, मोहरी, तूरडाळ, मूग डाळ, अंगाचे साबण, कपड्याचे साबण, भांड्याचे साबण व इतर साहित्याचे अन्नधान्याचे कीट दिले. याप्रसंगी तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार (पुरवठा) राजेश बेंबळगे, मंडळ अधिकारी शंकर जाधव, तलाठी पंकज कांबळे उपस्थित होते. याबद्दल अंजली पटेल यांनी आभार मानले.