राजकुमार जोंधळे, लातूर: जिल्ह्यामध्ये विनापरवाना ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हँड ग्लायडर्स, हॉट एअर बलून आदींच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली, याबाबतचे आदेश लातूरचे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी शुक्रवारी जारी केले आहेत.
सध्या भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत दहशतवादी, राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक्राफ्ट, पॅराग्लायडरचा वापर करून हल्ला करू शकतात. शिवाय, त्यामाध्यातून व्हीव्हीआयपींना, लातूर जिल्ह्यातील मर्मस्थळांना लक्ष्य करू शकतात. यातून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असते. यासाठी ड्रोन रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक्राफ्ट, पॅराग्लायडरद्वारे संभाव्य घातपात रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये ३० दिसांसाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कलम १६३ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अन्वये ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक्राफ्ट. पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हँड ग्लायडर्स, हॉट एयर बलून आदींच्या उड्डाणांवर लातूर जिल्ह्यात १७ मे ते १५ जून अखेरपर्यंत बंदीचे आदेश दिले आहेत.
तीस दिवसांसाठी बंदीयामध्ये हवाई पाळत ठेवणे अथवा पोलिस अधीक्षक, लातूर यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने केली जाणारी कारवाई यामध्ये अपवाद म्हणून वगळण्यात आली आहे. हा आदेश १७ मेपासून १५ जूनपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असून या आदेशाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.