अहमदपूर शहरातून जाणा-या महामार्गावर ग्रामीण रुग्णालयासमोर एक विद्युत खात असल्याने दोन महिन्यांपासून वाहतुकीची समस्या निर्माण होत होती. गुत्तेदाराने विद्युत खांब न काढता तेथील जागा वगळली होती. बाजूच्या रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे तिथे एकेरी वाहतूक सुरु होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत होत्या. या मार्गावर पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय आदी शासकीय कार्यालये असल्यामुळे वाहनांची ये- जा मोठ्या प्रमाणात होती. याबाबत लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच त्याची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांनी स्वतः लक्ष घालून सदरील विद्युत खांब महावितरण व गुत्तेदाराने काढण्यासंबंधी सूचना केल्या. त्यानुसार हा खांब हटविण्यात आला आहे. तसेच रस्ताही दुरुस्त करण्यात आला. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे. नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
***