राजकुमार जाेंधळे, चाकूर / चापोली (ता. लातूर) : गॅसला पैसे दिले मात्र, माझी स्पर्धा परिक्षेची फी का दिली नाही? म्हणून डाेक्यात लाकडाने मारुन जन्मदात्याला संपविल्याची घटना हिंप्पळनेर गावात मंगळवारी घडली. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पाेलिसांनी मुलाला अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, हिंप्पळनेर (ता. चाकूर) येथे देविदास काशीराम पांचाळ (वय ७०) यांची परस्थितीत अत्यंत हालाखीचा असून, कुटुंबात पत्नी शारदाबाई (वय ६०) आणि मुलगा अजय (वय २४) आहेत. वडील देविदास आणि आई शारदाबाई हे भाजीपाला विक्री आणि माेलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मुलगा अजय हा इयत्ता बारावीपर्यंत शिकला आहे. ताे सध्या पाेलिस भरतीची तयारी करत हाेता. फी भरण्यासाठी पैसे मागत हाेता. सोमवारी रात्री वडील देविदास यांना त्याने पैसे मागितले. पावसामध्ये घरातील जळतन भिजले. त्यात गॅस सिलेंडरही संपले.
आई शारदाबाई यांनी गॅस घेतला. मुलगा म्हणाला, गॅसला पैसे आहेत, फीससाठी पैसे नाहीत का? असे म्हणून त्याने भांडण सुरु केले. आई म्हणाली, गॅसमुळे सध्या पैसे नाहीत. जळतन भिजल्याने चूल पेटत नव्हती. यासाठी गॅस सिलेंडर घेतले. तू शांत हो...,उद्या सकाळ हाेताच मी काेठून तरी पैशाची जाेड करते, असे म्हणून समजूत काढली. मुलगा म्हणाला, मला आताच पैसे हवेत. पैसे मिळाले नसल्याने परत मुलाने मंगळवारी पहाटे वडिलांसोबत वाद घातला. याच रागातून वडिलांच्या डोक्यात मुलाने काठी घातली. यामध्ये ते जागेवरच निपचित पडले.
आईने आरडाओरडा केला असता, शेजाऱ्यांनी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक रवींद्र चौधर, पोनि. बालाजी भंडे, सपोउपनि. मुरलीधर मुरकुटे यांनी भेट देत पाहणी केली. मयत देविदास पांचाळ यांना पत्नी, मुलगा, मुलगी असून, मुलीचा विवाह झाला आहे. याबाबत शारदाबाई पांचाळ यांच्या तक्रारीवरुन चाकूर पाेलिस ठाण्यात मुलाविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.