शिरुर अनंतपाळ नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने विविध विकासकामे करण्यात आली आहेत. परंतु, या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करुन या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने यापूर्वी निवेदन दिले होते. तेव्हा योग्य ती चौकशी केली जाईल, असे लेखी आश्वासन नगरपंचायतीच्या वतीने अनिल देवंग्रे यांना दिले होते. परंतु, अद्याप कोणतीही चौकशी झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत सोमवारपासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यात अनिल देवंग्रे, अशोक कोरे, बाबुराव तोरणे, मधुकर धुमाळे, महादेव आवाळे, सुचित लासुणे आदी सहभागी झाले आहेत.
चौकशी करण्यात यावी...
शहरात लाखो रुपये खर्चून झालेली वृक्षलागवड, पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन, नाल्यांचे बांधकाम, १४ व्या वित्त आयोगातील विहीर, स्मशानभूमी सुशोभिकरण, विशेष फंडाचा वापर, विद्युतीकरण साहित्याची चोरी, सार्वजनिक शौचालय, रंगरंगोटी न करता बिल आकारणी, टंचाईकाळात घेण्यात आलेले बोअर आदी कामांची महिनाभरात चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते पूर्ण केले नाही. त्यासाठी हे उपोषण सुरु असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
***