बियाणे उगवण क्षमतेची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी
लातूर : गतवर्षी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे यंदा कृषी विभाग सतर्क झाला असून बियाणे उगवण क्षमतेचे परीक्षण केल्याशिवाय बियाणे विकू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने दुकानदारांना केले आहे. त्यानुसार दुकानदारांनी केलेल्या उगवण क्षमतेची प्रातिनिधिक पाहणी उदगीर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केली. यावेळी संदीप देशमुख, सतीश जवळगे, बालाजी हाडोळे, कल्लाप्पा वाडकर व उदगीर कृषी सेवा असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------------
लेफ्टनंटपदी भरडे यांची नियुक्ती
लातूर : अहमदपूर येथील शुभम चंद्रकांत भरडे यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. एस.एस.बी. परीक्षेतून सैन्य भरतीसाठी त्यांची ही निवड झाली होती. चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण केंद्र येथे एक वर्षाचा प्रशिक्षणार्थी कालावधी संपून त्यांची पूंछ येथील कुमाऊं रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. शुभम भरडे यांनी यापूर्वी कोल्हापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत भारतातून पहिला नंबर मिळविला होता.
---------------------------------
पाळीव प्राण्यांसाठी लातुरात विद्युत दाहिनी
लातूर : मुंबईच्या धर्तीवर पशुसंवर्धन विभागाने पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहन करण्यासाठी विद्युत दाहिनीची व्यवस्था करावी त्यासाठी जिल्ह्यात जागेची पाहणी करून तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात पाळीव प्राण्यांच्या दाहिनीची काहीच व्यवस्था नाही. जागा उपलब्ध असलेले पशुपालक मृत प्राण्यांची विल्हेवाट लावतात. जागा नसलेल्या पशुपालकांची अडचण होते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने विद्युत दाहिनीसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
-------------------
निर्जंतुकीकरण फवारणी करण्याची मागणी
लातूर : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता थोडा निवळत आहे. तरीही या भागात आणि ज्या गावात रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते, त्या भागात खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे. आरोग्य विभागाने यात लक्ष घालावे, अशीही मागणी होत असून शहरात अनेक नागरी दवाखान्यांतर्गत रुग्ण आढळलेले आहेत. त्या ठिकाणी फवारणी करावी, अशी मागणी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
-----------------------------------
कृषी विभागाच्या वतीने बीज प्रक्रिया मोहीम
लातूर : कृषी उत्पन्न बाजार समिती औसा व कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येक गावात बीज प्रक्रिया मोहीम राबविली जात आहे. शाश्वत उत्पादनाची हमी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याचा मेळ कसा घातला जावा याबाबतची माहिती अभियानात दिली जात आहे. मागील तीन दिवसांत बेलकुंड, लामजना, औसा, किल्लारी या कृषी मंडळातील प्रत्येक गावात मंडळनिहाय उगवण क्षमता तपासणी, दहा टक्के रासायनिक खताची बचत, बीबीएफ तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया माहिती याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती औसा व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
वि. दा. सावरकर यांची जयंती साजरी
लातूर : अहमदपूर शहरात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त जीवक आरोग्यमंदिर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, अमित रेड्डी, ॲड. भारत चामे, डॉ. मधुसूदन चेरेकर, मकरंद जोशी, ॲड. दिलीप मावलगावकर, संजय अरसुडे, अशोक गायकवाड, संपन्न कुलकर्णी, गौरव चवंडा, सागर कुलकर्णी, अंजली कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.