अहमदपूर (जि. लातूर) : हडोळतीच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने बैलजोडी परवडेना म्हणून स्वत:ला औताला जुंपले, ही वार्ता ऐकून अस्वस्थ झालेले अहमदपूर तालुक्यातीलच धानोऱ्याचे शेतकरी सहदेव होनाळे यांनी नांगर हाती घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याचा शुक्रवारी निर्धार केला आहे.
व्यथा सरकार दरबारी मांडायच्या तर प्रत्येकाने खांद्यावर जू घ्यायचा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांचा मुलगा ओमकार याच्याशी संपर्क केला असता तो म्हणाला, वडिलांनी मुंबईला जायचे आहे, असे सांगितले होते. तत्पूर्वी खांद्यावर जू घेतलेल्या शेतकऱ्याच्या बातमीनंतर ते म्हणाले, मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याची अशीच कहाणी आहे. पाऊस नाही पडला तर धो- धो पडतो. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याची शेती कधी पिकलीच तर शेतमालाला भाव मिळत नाही. या सर्व अडचणी मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायची आहे. ते गाऱ्हाणे ऐकतील, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. त्यांना तीन भावांमध्ये साडेनऊ एकर जमीन आहे, असे त्यांच्या मुलाने सांगितले.