औसा : शासनाच्या योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व त्यांचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आपण मतदारसंघात खरीपपूर्व तयारी, मनरेगा व कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी दौरा करत असून, कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. शेतकऱ्यांनी बांधावर फळ लागवड करावी, असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.
मतदार संघातील आलमला येथून त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, कृषी अधिकारी संजय ढाकणे, संतोषअप्पा मुक्ता, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय कुलकर्णी, आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊसाला पर्याय म्हणून रेशीम शेतीकडे वळावे. त्यातून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडेल. कृषी विभागाच्या ७७ योजना असून, कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ द्यावा.
अधिकांऱ्याच्या सहकार्याने मतदारसंघात योजना यशस्वी होत असून, राज्यात मनरेगा कामामध्ये औसा मतदारसंघ अव्वल स्थानी आहे. मनरेगांतर्गत बांधावर, सलग अथवा पडीक जमिनीवर केशर आंबा, चिंच या फळबागेची लागवड करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी गोठा, बांधावर वृक्ष लागवड, गांडूळ खत, जीवामृत प्रकल्प व शेततळे आदींचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करावे. मतदार संघातील आलमला, उंबडगा बु., उंबडगा खु., बुधोडा, सेलू, खुंटेगाव, हासेगाववाडी, हासेगाव, हिप्परसोगा, हसाळा व शिंदाळा (ज.) या गावांचा आमदार पवार यांनी दौरा केला.
साडेतीन महिन्यात ५०० किमीचे शेतरस्ते...
अवघ्या साडेतीन महिन्यात मतदारसंघात ५०० किलोमीटर लांबीच्या शेतरस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, मतदारसंघात २,२७० शेतरस्ते तयार करायचे आहेत. या कामानंतर प्रामुख्याने विजेचा प्रश्न सोडविण्यावर काम केले जाणार आहे. रस्ता, वीज आणि पाणी या त्रिसुत्रीचा अवलंब शेतकऱ्यांनी केला पाहिजे, असेही आमदार पवार म्हणाले.