औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरात मृगाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे, खते खरेदी करून खरिपाची पेरणी करण्यास सुरुवात केली. मृगात पेरणी झाल्यास पीक चांगले येते आणि उत्पादन चांगले मिळते, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान, पिकेही उगवली आहेत. परंतु, गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कोवळी पिके कोमेजू लागली आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. दरम्यान, हरणांचे कळप कोवळ्या पिकांवर ताव मारून ते फस्त करीत आहेत. तसेच रानडुकरे पिकांची नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
आठवडाभरात पाऊस न झाल्यास उगवलेली पिके जळून जाण्याची भीती आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी वन्यप्राण्यांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी रात्रीच्यावेळी शेतात थांबत असल्याचे पहावयास मिळत आहे.
ढग येतात दाटून...
मृगाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली पिके आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पाऊस गायब झाला आहे. पाऊस येईल, असे वातावरण निर्माण होते, परंतु सायंकाळच्या सुमारास आलेले ढग न बरसताच निघून जातात.
शेतकऱ्यांची चिंता वाढली...
जूनच्या सुरुवातीस चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनची पेरणी केली. पीकही उगवले. परंतु, पावसाने दडी मारल्याने सिंचनाद्वारे पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास उगवलेले पीक फस्त करीत आहेत. त्यामुळे रात्रभर जागरण करून पिकांचे रक्षण करावे लागते. सध्या पावसाची प्रतीक्षा आहे.
- सुरज पाटील, शेतकरी, बेलकुंड.