चाकूर : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीपातील पिके संकटात असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र असून, गुरुवारपासून रिमझिम पाऊस बरसत आहे. दरम्यान, पिकांसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून, पाऊस न झाल्यास सोयाबीनचे मोठे नुकसान होणार आहे.
चाकूर तालुक्यात मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पेरणी केली. मध्यंतरी समाधानकारक पाऊस पडल्याने शेतशिवारातील पिके बहरली होती. मात्र, ऐन शेंगधारणेच्या वेळी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतशिवारातील पिके दुपार धरु लागली आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असताना चाकूर तालुक्यात मात्र, समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. गुरुवारी केवळ रिमझिम पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. चाकूर तालुक्यात खरीपाचे क्षेत्र ५८ हजार ९४१ हेक्टर आहे. त्यापैकी ३३ हजार ७७८ हेक्टर्सवा सोयाबीनचा पेरा आहे. पाऊस मोठा नसल्याने तालुक्यातील अनेक धरणातील पाणी पातळीचा साठा वाढलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
सोयाबीनच्या उत्पादनात होणार घट...
खरीप हंगामात पाऊस पुरेसा नसल्याने सोयाबीन पिकात मोठे नुकसान होणार आहे. बी- बियाणे, रासायनिक खते महागडी घेऊन पेरणी झाली. परंतु, पाऊस समाधानकारक नसल्याने उत्पादनात घट होणार आहे. पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी. - नागनाथ पाटील, शेतकरी
शेतकऱ्यांना भरीव मदत करावी...
शेती व्यवसाय आता परवडणारा राहिला नाही. पावसाच्या आशेवर शेती करणे अवघड झाले आहे .केंद्र व राज्य सरकारने शेतीसाठी विशेष धोरण राबविले पाहिजे. भरीव मदतीची गरज आहे. - विलास देशमाने, शेतकरी
सध्याच्या पावसामुळे तूर, ज्वारी फायदा...
तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन पिकाला याचा फटका बसेल. सध्याच्या पावसाने तूर, ज्वारीला मदत होईल. - भुजंग पवार, तालुका कृषी अधिकारी