राजकुमार जाेंधळे / लातूर : स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फाेटात दाेन स्कूल व्हॅन खाक झाल्याची घटना समाेर आली आहे. ही घटना लातुरातील न्यू भाग्य नगर येथे साेमवारी रात्री घडली. यामध्ये स्कूल व्हॅनधारकासह एक महिला, मुलगी भाजली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात मात्र अद्यापही घटनेची नाेंद नाही.
लातुरातील न्यू भाग्य नगरात एका घरासमाेर साेमवारी रात्री एका स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरताना अचानक आग लागली. ही आग एवढी भयानक हाेती की माेठ्या प्रमाणात या दाेन्ही व्हॅनने पेट घेतला. यात दाेन्ही स्कूल व्हॅन जळून खाक झाल्या असून, टायरचे स्फाेट झाले. यामध्ये एक महिला आणि एक मुलगी भाजली असून, स्कूल व्हॅनधारक मात्र गंभीर जखमी झाला आहे. आग लागल्यानंतर काही तासासाठी या परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला हाेता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दाेन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमनच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग नियंत्रणात आणली.
स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरणे आले अंगलट...जखमी स्कूल व्हॅनधारकाकडे दाेन व्हॅन असून, ते साेमवारी रात्री व्हॅनमध्ये गॅस भरत हाेते. दरम्यान, घरामध्येच स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरताना अंगलट आले. झालेल्या स्फाेटात एकाचवेळी दाेन्ही व्हॅन खाक झाल्या आहेत.
घरातच भरला जात हाेता गॅस...जखमी व्हॅनधारक हे घरातच आपल्या व्हॅनमध्ये गॅस भरत हाेते. त्यातूनच अचानकपणे हा स्फाेट झाला आणि ही घटना घडली. चुकीच्या पद्धतीने गॅस भरताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची रात्री उशिरापर्यंतही एमआयडीसी पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आलेली नव्हती.