उदगीर : आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दिवसातून ठराविक वेळ दिल्याशिवाय पर्याय नाही, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अरुण खरात यांनी व्यक्त केले.
येथील मराठी विज्ञान परिषद, धन्वंतरी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित कोविड-१९ महामारी जनजागरण आरोग्य अभियान सप्ताहांतर्गत ‘कोविडोत्तर शारीरिक व मानसिक समस्या आणि उपाय’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते. यावेळी परिषदेचे माजी पदाधिकारी प्रा. सुभाष बडीहवेली, प्रा. रमाकांत मध्वरे उपस्थित होते.
यावेळी डॉ. खरात म्हणाले, कोरोना झाल्यानंतर न घाबरता हिमतीने मुकाबला केला पाहिजे. भारतीयांच्या बदलत्या व चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण या प्रादुर्भावाला सहज बळी पडत आहोत. दर सहा महिन्याला आरोग्यविषयक तपासणी करून घेतल्यास भविष्यातील धोक्याची सूचना मिळू शकते. मानसिक तणाव न घेता दररोज व्यायाम करणे, पालेभाज्या व फळांचा आहार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यासोबतच शारीरिक मेहनतीची कामेसुद्धा आवश्यक आहेत. कोरोना झाल्यावर व नंतर मानसिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे आहे. मन खंबीर आणि शरीर तंदुरुस्त असल्यास कोणतीही व्याधी सहजासहजी होत नाही. उत्तम व्यायाम, सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. उर्मिला शिरसी यांनी केले तर प्रा. डॉ. संजय निटुरे यांनी आभार मानले.