श्री केशवराज विद्यालयात शैक्षणिक वर्षारंभ दिन
लातूर : येथील श्री केशवराज विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चा पहिला दिवस नवीन शैक्षणिक वर्षारंभ दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यवाह नितीन शेटे, डॉ. सुरेंद्र आलूरकर, ॲड. दिलीप कुलकर्णी, डॉ. मनोज शिरूरे, संजय विभुते, शिवाजी हेंडगे, महेश कस्तुरे, संजय कुलकर्णी, बालासाहेब केंद्रे, संदीप देशमुख, अंजली निर्मळे आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
क्रेडाई युथ विंगतर्फे वृक्षारोपण मोहीम
लातूर : सिकंदरपूर रोड लातूर येथील परिसरात क्रेडाई युथ विंगतर्फे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी परिसरात एक हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध बेळंबे, युथ विंगचे अध्यक्ष गीते, धर्मवीर भारती, महेश नावंदर, नवनाथ गिते, जयकांत गीते, आकाश कोटलवार यांची उपस्थिती होती. वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन धर्मवीर भारती यांनी केले. कार्यक्रमास क्रेडाई युथ विंगचे पदाधिकारी उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात जयंती साजरी
लातूर : येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जयंती महोत्सव समितीच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय गवई, आत्माराम लोमटे, योगिराज माकणे, शुभम बिराजदार आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवन कार्याविषयी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी मार्गदर्शन केले.
......................................................................................
जिजामाता विद्यालयात शिक्षकांचा सत्कार
लातूर : येथील एमआयडीसी परिसरातील जिजामाता विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी आ. विक्रम काळे यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका सलिमा सय्यद, एस.पी. खंदारे, प्रा. सुनील नावाडे, प्रा. बाबासाहेब सोनवणे, प्राचार्य मनोज तांदळे, अनिल वैष्णव आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, शाळा बंद असल्याने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
उपतालुका प्रमुखपदी मल्हारी तनपुरे यांची निवड
लातूर : शिवसेना लातूर उपतालुका प्रमुखपदी मल्हारी तनपुरे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी ही निवड केली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख विठ्ठलराव गायकवाड यांच्या सूचनेनुसार मल्हारी तनपुरे यांची उपतालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी सांगितले. या निवडीबद्दल तनपुरे यांचे कौतुक होत आहे.
प्रभाग क्र. ९ येथे नागरिकांची गैरसोय
लातूर : शहरातील प्रभाग क्र. ९ येथे नागरिकांना सुविधांचा अभाव आहे. या परिसरात पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या या भागात पावसाळ्यात पाणी तुंबल्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागते. दरम्यान, मनपाकडे वारंवार पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष पप्पू धोत्रे यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.
विजय टाकेकर यांचा लातुरात सत्कार
लातूर : लातूर शहरातील गरजू व्यक्तींना कोरोना काळात मदत केल्याबद्दल युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय टाकेकर यांचा राजमाता बहूद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बालाजी जाधव, अनिल सूरनर, विक्रम टाकेकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, आगामी काळातही गरजूंना मदत करणार असल्याचे विजय टाकेकर यांनी सांगितले.
पहिल्याच पावसात नांदेड रोडच्या दुतर्फा पाणी
लातूर : शहरातील शाहू चौक ते गरुड चौक नांदेड रोडवर रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली नसल्याने पहिल्याच पावसात रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचले. परिणामी, या गैरसोयीचा लातूर शहर व पूर्वभाग कृती समितीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी समितीचे आनंद सोनवणे, बाबासाहेब बनसोडे, शंकर जाधव, दत्ता म्हेत्रे, सांगलीकर, भगवेश्वर धनगर आदींसह शहर पूर्वभाग नागरी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय
लातूर : लातूर शहरानजीक असलेल्या सदाशिव नगर, गोविंद नगर या भागात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पहिल्याच पावसात नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. रस्त्याला मंजुरी मिळाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
आदिवासी महिला बचत गटांना आवाहन
लातूर : विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटांना शेळी गट वाटपाची योजना मंजूर असून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड व लातूर जिल्ह्यांतील रहिवासी लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अर्जांचा नमुना कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून, परिपूर्ण प्रस्ताव २० जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद यांनी केले आहे.
प्लास्टिक अस्तरीकरणासाठी प्रस्ताव सादर करा
लातूर : अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळ्याचे खोदकाम प्लास्टिक अस्तरीकरणासह करणे ही योजना मंजूर असून, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकडून अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याओ आवाहन करण्यात आले आहे. २० जूनपर्यंत प्रस्ताव स्वीकारले जाणार असून, ७/१२, ८ अ, जातीचा दाखला, दारिद्र्यरेषेखालील दाखला, लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
रिंग रोड परिसरात नागरिकांची गैरसोय
लातूर : शहरातील रिंग रोड परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे काम वाढले आहे. अनेकदा वाऱ्यामुळे हा कचरा रस्त्यावर येत असून, वाहनधारकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. नियमित घंटागाडी येत नसल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. दरम्यान, याकडे मनपा प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन नियमित घंटागाडी सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.