पक्ष्यांसाठी अन्न व पाणपोईची सुविधा
लातूर : शहरातील दत्त मंदिर परिसर, महादेवनगर, बालाजीनगर, गोरोबा काका सोसायटी, स्वामी विवेकानंद पोलीस चौक परिसर, सावित्रीबाई फुले उद्यान आदी ठिकाणी पक्ष्यांकरिता अन्न व पाण्याची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमाला उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्याहस्ते प्रारंभ झाला. यावेळी मनपा परिवहन सभापती मंगेश बिराजदार, नगरसेवक इम्रान सय्यद, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, राज धनगर, सुमित खंडागळे उपस्थित होते.
घंटागाडी येत नसल्याने रस्त्यावर टाकला जातो कचरा
लातूर : शहरातील प्रभाग क्र. १३ मधील खाडगाव रिंग रोडलगत असलेल्या राम-रहिमनगर भागात घंटागाडी येत नसल्याची ओरड आहे. आठ ते दहा दिवस घंटागाडी येत नसल्याने अनेकजण कचऱ्याच्या पिशव्या रिंग रोडलगत असलेल्या रिकाम्या जागेत आणून टाकत आहेत. तसेच गटारीतून काढलेला कचराही तब्बल १५ दिवसांपासून उचलण्यात आला नसल्याने पुन्हा तोच कचरा नालीत पडला आहे. शिवाय, रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढली आहे. रिंग रोडलगत असलेल्या नालीतून पूर्णपणे पाण्याचा निचरा होत नसल्याने कचरा जमा होतो. आठवड्यातून किमान एकवेळ तरी रस्त्यालगत नालीतील कचरा काढावा, अशी मागणी होत आहे.
जवळगा येथे नाथषष्ठी सोहळ्याला प्रारंभ
जवळगा : देवणी तालुक्यातील जवळगा येथे गेल्या अनेक वर्षांपासून संत एकनाथ षष्ठीच्यानिमित्ताने नाथषष्ठी साजरी करण्याची परंपरा कुलकर्णी कुटुंबाने जोपासली आहे. त्यांची चौथी पिढी हा उपक्रम राबवीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून सोहळा सुरू करण्यात आला आहे. यावेळी पद्माकर कुलकर्णी, हरिराम कुलकर्णी, माधव महाराज कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी, कृष्णा कुलकर्णी, बालाजी कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, बबन जोशी, राजू जोशी आदी उपस्थित होते.