डॉ. नारायणराव चाटे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्राचार्य डॉ. धनंजय चाटे शैक्षणिक उपक्रम हाती घेत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासासाठी शहरात जातात. मात्र, चापोलीसारख्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना हा खर्च झेपणारा नसतो. हीच बाब लक्षात घेऊन यंदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करून त्यांना वर्षभर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा संबंधित साहित्य व इतर सुविधा मोफत देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या वर्षभराच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे. आजपर्यंत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी पोलीस खात्यात मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
यावेळी डॉ. नारायणराव चाटे यांचा सत्कार करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपसरपंच निसार देशमुख, मुख्याध्यापक किशन सोमवंशी, चिमेगावे, एम. एन. केंद्रे, सकनुरे, धनंजय जाधव, अलिम शेख, ज्ञानेश्वर पांचाळ, प्रा. गौतम बनसोडे, प्रा. डॉ. नारायण जायभाये, नाथा मद्रेवार, रंजित मुंढे उपस्थित होते. (वा.प्र.)