ऑनलाईन गंडा घालण्यासाठी सायबर भामट्यांकडून विविध आमिषे दाखविली जात आहेत. वेगेवगळ्या प्रकारची शक्कल लढवून, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना गंडविण्याचे प्रकार माेठ्या प्रमाणावर घडत आहेत. काहीतरी वेगळे कारण सांगत फक्त एक काॅल करू द्या, माझा आताच बॅलन्स संपला आहे. असा बहाणा करत माेबाईल मागून घेतात आणि त्यावरून ओटीपी क्रमांक मिळवून बॅंक खात्यातील पैसे परस्पर लंपास करतात. यासाठी आता प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे.
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते आपली फसवणूक...
काॅल करण्यासाठी माेबाईल घेऊन...
काॅल करायचा, असे सांगत माेबाईल घेतात. त्यानंतर माहिती न हाेऊ देता ओटीपी घेतात.
वेगळी लिंक पाठवून...
ई-मेल किंवा माेबाईलवर वेगवेगळ्या लिंक पाठवतात. ती ओपन करताच पैसे गायब हाेतात.
लाॅटरी लागली असे सांगून...
लाॅटरी लागली असे सांगून काॅल केला जाताे. त्यानंतर ओटीपी विचारला जाताे.
केवायसीसाठी आवश्यक...
बॅंकेतून बाेलत असून, केवायसीसाठी तुमच्या क्रमांकावर आलेली ओटीपी मागतात.
ही घ्या काळजी...
१ आपल्या बॅंक खात्याबाबत माहिती कुणालाही देऊ नका. बॅंकेचा अधिकारी कधीच माहिती विचारत नाही.
२ अनाेळखी व्यक्तीचा मेल किंवा मेसेज आल्यास संपूर्ण खातरजमा करूनच ते ओपन करावे. विनाकारण आलेल्या मेलला, मेसेजला प्रतिसाद देऊ नका.
३ बॅंकेचे अधिकारी कधीच फाेन करून माहिती किंवा ओटीपी विचारत नाहीत. परिणामी, कुणीही फाेन करून बॅंक खात्याची माहिती विचारत असेल, तर अजिबात देऊ नका.
आपल्या बॅंक खात्याबाबतची माहिती काेणालाही देऊ नका. लाॅटरी, वाहन आणि विविध बक्षीस लागल्याचे मेल किंवा मेसेज येतात. याबाबत खातरजमा करून, लाॅटरी लागली का, स्पर्धेत आपण भाग घेतला हाेता का, नसेल तर अशा मेल्स आणि मेसेजला अजिबात रिप्लाय देऊ नका. फसवणूक झाल्यास पाेलीस ठाण्यांशी संपर्क साधून तक्रार नाेंदवा.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर