नागरसोगा : रुग्णांना आरोग्य सेवा देण्याबरोबरच औसा येथील एका डॉक्टर दांपत्याने शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी चार एकर माळरानावर आंबा, चिकू, पेरू, सीताफळ, नारळाची लागवड केली आहे. ही फळबाग सध्या बहरली आहे.
औसा येथील डॉ. अशोक हेरकर व त्यांची पत्नी डॉ. राजश्री हेरकर हे दोघेही रुग्ण सेवा देतात. त्याचबरोबर त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यांना दावतपूर येथे साडेचार एकर जमीन असून, त्यात एक बोअर घेतला आहे. त्यांनी तिथे चिकूची १००, सीताफळांची १००, पेरूची १ हजार, केशर आंब्याची १ हजार, बोराची १०, नारळ १५०, अंजीर ८०, जांभूळ ४० आणि सागवानाची ६० वृक्ष लावली आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत ही फळबाग फुलविली आहे. पहिल्या वर्षीच त्यांनी पेरूचे उत्पादन घेतले आहे.
ऐन रस्त्याच्या बाजूस ही फळबाग असल्याने प्रवासी त्याकडे कुतूहलाने पाहत असतात. विविध कालावधीत येणाऱ्या फळांची लागवड केल्यामुळे प्रत्येक कालावधीत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावयास मिळतो. तसेच पक्ष्यांनी खाल्लेले अर्धवट फळे झाडाखाली पडल्याचे दिसून येतात. वन्यजीवांसाठी पाण्याची सोय असल्याने मुंगूस, ससे तसेच अन्य पक्षी येथे येतात.
वृक्षलागवड ही काळाची गरज...
वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच आम्ही फळबाग लावली आहे. त्यातून झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी फळबाग लागवडीकडे वळून प्रगती साधावी, असे डॉ. अशोक हेरकर यांनी सांगितले.
कमी पाण्यावरही फळबागेची लागवड करता येते. त्यामुळे आम्ही फळबाग लावली आहे. मुलांच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही शेतात राहातो. त्यामुळे आनंद मिळतो. याशिवाय, उत्पन्नही मिळते. सर्व ऋतूंत फळांचा आस्वाद चाखता येतो, असेही ते म्हणाले.