लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकाेट, देवणी, शिरुर अनंतपाळ, निलंगा, औसा आणि रेणापूर तालुक्यात माेठ्या प्रमाणावर गत दाेन वर्षांत घरफाेडी, दुचाकी पळवणे आणि महिलांच्या गळ्यातील गंठण हिसकावत पळ काढण्यात आल्याच्या घटना शेकडाेंच्या घरात आहेत. तक्रारदारही आता संबंधित पाेलीस ठाण्यांत खेटे मारुन थकले आहेत. पाेलिसांकडून तपास सुरु आहे, हे एकच उत्तर त्यांच्या कानी पडत आहे. काही गुन्ह्यात लातूर पाेलिसांनी चाेरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे; मात्र बहुतांश गुन्ह्यांतील मुद्देमाल पाेलिसांच्या हाती लागत नसल्याचे चित्र आहे.
लूट लाखाेंची...
एकाच रात्री दाेन ठिकाणी घरफाेडी...
चाकूर तालुक्यातील लातूरराेड आणि अहमदपूर येथे चाेरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत एकाच रात्री दाेन ठिकाणी धाडसी घरफाेड्या केल्या आहेत. यातील वाहन मात्र पाेलिसांच्या हाती लागले आहे; मात्र चाेरट्यांचा थांगपत्ता अद्यापही लागला नाही. या घटनेत चाकूर आणि अहमदपूर येथील पाेलीस तपास करत आहेत. पाेलिसांच्या हाती लागलेली कार ही अंबाजाेगाई येथून चाेरण्यात आल्याचे समाेर आले.
जळकाेट तालुक्यात चाेऱ्या...
गत आठवड्यात जळकाेट पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये चाेरीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी शेतीची औजारे चाेरट्यांनी पळविली आहेत. यामध्येही लाखाे रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याबाबत जळकाेट पाेलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता चाेरट्यांच्या मागावर पाेलीस पथके आहेत.
लातुरात घरफाेड्यांचे प्रमाण अधिक...
लातूर शहरात घरफाेडी आणि माेटारसायकल पळविण्याच्या घटना माेठ्या प्रमाणावर घडत आहेत. बंद घरांवर चाेरट्यांची नजर आहे. शिवाय, अपार्टमेंटमधील फ्लॅट फाेडण्याचे प्रमाणही माेठे आहे. गत सहा महिन्यात लाखाे रुपयांच्या घरफाेड्या चाेरट्यांनी केल्या आहेत. श्रीनगर परिसरातील एक घर फाेडून पावणेदाेन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. घरफाेडी, चाेरी आणि माेटारसायकल पळविण्याचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे.
विशेष पाेलीस पथक मागावर...
लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विशेष पाेलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शिवाय, स्थानिक पाेलीस पथकेही कार्यरत आहेत. या पाेलीस पथकांकडून अलीकडे काही गुन्ह्यांतील आराेपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर