जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. बुधवारी ३९७ बाधितांची भर पडली असून एकूण २९ हजार ३२६ बाधितांची संख्या झाली आहे. त्यातील २५ हजार ८९१ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. सध्या शासकीय रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये २ हजार ७०७ जणांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर आणखीन कमी करण्याबरोबरच कोविड केअर सेंटरमध्ये काहीवेळेस निर्माण होणारा एकलपणा दूर करण्यासाठी आणि तेथील समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्ह्यातील दहाही गटविकास अधिका-यांना तालुकास्तरावर समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
या केंद्रातून शिक्षक संबंधित कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून त्यांना कुठला त्रास होत आहे का, घरातील अन्य कुणाला कुठलीही लक्षणे जाणवत आहेत का, तिथे आरोग्य कर्मचा-यांकडून सेवा दिली जाते का याची माहिती घेणार आहेत. तसेच मानसिकदृष्ट्या खचलेल्या रुग्णांचे समुपदेशन करणार आहेत.
आरोग्य सेवा आणखीन वाढणार...
कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्यासह आवश्यक सुविधा मिळतात की नाही, याची थेट माहिती मिळणार आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांचीही चौकशी केली जाणार आहे. मानसिकदृष्ट्या तणावाखाली असलेल्यांचे समुपदेशन केले जाणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.