लातूर ग्रामीण मतदारसंघात आ. देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे विविध विकासकामांना महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापैकीच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सलगरा बु.- दगडवाडी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ तसेच इतर कामांचे लोकार्पण व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आ. धीरज देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे गत सप्टेंबरमध्ये या कामांना तांत्रिक मान्यता मिळाली. त्यानंतर एप्रिलमध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यामुळे हे काम आता प्रत्यक्ष सुरू झाले आहे. यावेळी त्यांनी दगडवाडी येथील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचीही पाहणी केली.
भातांगळी येथे लातूर जिल्हा बँकेच्या सहकार्याने उभारलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गुदामाचे लोकार्पण झाले. तसेच, आमदार फंडातून येथे उभारलेल्या आरओ प्लांटचे व विंधन विहिरीचे भूमिपूजन त्यांनी केले. शेतकऱ्यांसाठी सोयीसुविधा गावातच निर्माण केल्याने शेतकऱ्यांची चांगली सोय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी बामणीच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रमजानपूर- भाडगाव- भातांगळी- बामणी रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण व घरकुल कामाचे भूमिपूजन केले.
कोरोनामुळे सावध राहा!
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अद्याप संकट संपलेले नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आपले व कुटुंबाचे लसीकरण करून घ्यावे. शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करा. ग्रामपंचायतीनेही याबाबत खबरदारी घ्यावी. आजारी पडल्यास तत्काळ दवाखान्यात जा. कुठलेही आजार अंगावर काढू नका, असे आवाहन आ. धीरज देशमुख यांनी केले.