लातूर : शासकीय योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत घेऊन जाण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यानुसार लातूर तालुक्यातील निराधारांच्या संगांयो-इंगांयो योजनेची सर्व अर्ज प्रक्रिया तालुक्यातील ग्रामीण भागातील महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे अर्जदारांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
तहसील कार्यालय, लातूर येथे झालेल्या तालुक्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र संचालकांच्या बैठकीत ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गावातील संगांयो-इंगांयो योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना नजीकच्या महा ई-सेवा केंद्रावर उत्पन्नाचे प्रमाणपत्र दाखल करणे, शपथपत्र तयार करणे, संगांयोचे अर्ज दाखल करणे आदी सर्व प्रक्रिया करता येणार आहे. या प्रक्रियेत तलाठी, मंडल अधिकारी व संबंधित प्रशासकीय यंत्रणा गावपातळीवर जाऊन निराधारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहकार्य करणार आहे. त्यामुळे निराधारांना दिलासा मिळणार आहे. यावेळी तहसीलदार स्वप्नील पवार, नायब तहसीलदार राजेश जाधव, संगांयो समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, नायब तहसीलदार श्रावण उगिले, गणेश एकडे, पांचाळ उपस्थित होते.
गावपातळीवर भरता येणार अर्ज...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निराधारांची अडचण लक्षात घेऊन इंदिरा गांधी व संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी अर्ज प्रक्रियेचे गावपातळीवर सुलभीकरण करावे, यासाठी लातूर ग्रामीणची संगांयो समिती आग्रही होती. या प्रक्रियेमुळे निराधार लाभार्थ्यांना गावपातळीवर आधार मिळणार असल्याचे तहसीलदार स्वप्नील पवार, प्रवीण पाटील यांनी सांगितले.