जळकोट : जळकोट तालुक्याची निर्मिती होऊन २२ वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु, येथे अद्यापही तालुका न्यायालय स्थापन झाले नाही. त्यामुळे येथे तालुका न्यायालय सुरू करण्यात यावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
लातूर जिल्ह्याच्या सीमेवर जळकोट तालुका आहे. येथील नागरिकांच्या सोयीसाठी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. तालुका निर्मिती होऊन २२ वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, येथे अद्यापही तालुका न्यायालय निर्माण करण्यात आले नाही. जिल्ह्यातील इतर नवीन तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय स्थापन झाले आहेत. परंतु, येथे न्यायालय स्थापन करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.
जळकोटात तालुका न्यायालय निर्माण करण्यात यावे, अशी नागरिकांची सततची मागणी आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे पाटील व अन्य मंडळींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन साकडे घातले होते. तेव्हा हालचाली सुुरू झाल्या आणि येथे तालुका न्यायालय मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येऊन काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला होता. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु, अद्यापही येथे तालुका न्यायालय सुरू झाले नाही.
नागरिकांची अडचण दूर करावी...
जळकोटातील तालुका न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या इमारतीसाठी शहरातील विविध ठिकाणच्या इमारतींची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यातील एक इमारत निश्चित करण्यात आली. त्यामुळे तालुका न्यायालय लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे. येथे न्यायालय नसल्याने अन्य तालुक्याच्या ठिकाणी खटले दाखल असलेल्यांना सतत हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी येथील तालुका न्यायालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.