नांदेड-कंधार-जळकोट-उदगीर-तोगरी-बीदर महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. दोन्ही बाजूंनी काम जवळपास संपत आले आहे. सध्या जळकोटातील महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या बाजूने नाली बांधकाम होणार नाही, तसेच महामार्गावर रस्ता दुभाजकाची शक्यता नाही, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.
जळकोट हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरातील महामार्गावर रस्ता दुभाजक आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम करणेही महत्त्वाचे आहे. महामार्गावरील प्रत्येक गावात रस्त्याच्या बाजूने नाली बांधकाम करण्यात आले आहे. जर नाली बांधकाम झाले नाही तर पावसाळ्यात, तसेच सांडपाणी शहरातील घरांमध्ये घुसण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरात महामार्गाचे काम दर्जेदार करावे, रस्ता रुंद करावा, रस्ता दुभाजक निर्माण करावे आणि दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम करावे, अशी मागणी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जळकोट तालुका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.