कोरोनापासून बचावासाठी....
हळदीचे दूध ठरतेय लाभदायक..
घरात वापरल्या जाणाऱ्या हळदीमध्ये करक्युमिन हा औषधी घटक असतो. हळद अन्टिऑक्सिडंट, अन्टिबॅक्टेरियल आहे. यामुळे घशासह विविध संसर्ग ती कमी करते, जिवाणूसंसर्ग रोखते. खोकला, कफ यांना प्रतिबंध करते. रोगप्रतिकारक शक्तीची वृद्धी करते. दूध, हळद व गूळ यांचे एकत्र सेवन कोरोना काळात गुणकारी आहे.
सुंठ, लसूण अन् आलं...
स्वयंपाकघरातील अद्रक किंवा त्यास वाळवून मसाला डब्यात जाऊन बसलेली सुंठ सर्दी, ज्वर यांवर उपयोगी ठरलेली आहे. लसूणपण असाच उपयोगी आहे. उष्ण असलेल्या या वस्तू कफ निवारक आहेत. म्हणूनच पूर्वी बालकांना कफ झाल्यास आजी लसणाच्या कुड्यांची माळ घालत असे. श्वसन संस्था बळकट करणाऱ्या या वस्तूंचा वापर अनेक होम रेमडीजमध्ये केला जातो
तुळस, मध, मिरे अन् जिरे...
तुळशीत मोठ्या प्रमाणात असलेले ॲन्टी-बॅक्टेरियल आणि ॲन्टी-इंफ्लिमेंट्री गुण रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. तुळशीची पानं फ्लूचा धोकाही दूर करतात. तुळस, मिरीचा काढा सर्दीवर रामबाण उपाय. असेच बहुगुणी मध ताप, खोकला, कफ या आजारांत कामी येते. लिंबू, अद्रक, गुलकंद यासह मधाचे विविध नुस्खे आहेत.
डॉक्टरांचा कोट...
हजारो वर्षांपासून आयुर्वेद औषधी मानवी जीवनासाठी व्याधीहर आणि स्वास्थ्यपूरक म्हणून कार्य करीत आहे. कोविड संक्रमण टाळण्यासाठी योग्य आहार-विहार, प्राणायाम, योग यासोबत व्याधी प्रतिकर क्षमता वाढवणारी औषधी जसे आयुष काढा, गुडूची, तुलसी, हळद, मिरे, अश्वगंधा, ज्येष्ठमध चूर्ण वापर, च्यवनप्राश, हळदीचे दूध, वाफ घेणे, गुळण्या करणे, संक्रमण झाल्यास सुदर्शन वटी, गुडूच्यादी काढा, त्रिभुवन कीर्ती, कनकासव, श्वास कास चिंतामणी रस, करपुरदी लेह, हेमगर्भ रस आदी औषधे वापरल्याने रुग्ण बरा होण्यास मदत होते व उपद्रव टळतो.
कोविड बरा होऊन गेल्यानंतर बऱ्याच रुग्णांचे फुप्फुस, हृदय कमजोर होत आहे. मानसिक आजार तसेच ॲलर्जी होत आहेत. हे टाळण्यासाठीदेखील आयुर्वेद औषधी उपयुक्त ठरत आहे.
- डॉ. आनंद पवार, आयुर्वेद तज्ज्ञ