शेतीच्या कारणावरून झरी येथे मारहाण
लातूर : ‘तू शेतात यायचे नाही’, असे म्हणून एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना झरी शिवारात घडली. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्रीकांत निवृत्ती जाधव (३८) यांना ‘तू या शेतात यायचे नाही’ म्हणून किशन उत्तम जाधव याच्यासह अन्य दोघांनी संगनमत करून मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ६ मे रोजी घडली. याबाबत निलंगा पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉर्न वाजविण्यावरून एकाला मारहाण
लातूर : ‘जोराने हॉर्न वाजवू नका’, असे म्हटल्यामुळे तिघांनी मारहाण केल्याची घटना लातुरात घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी हरिश संतोष ढेकरे (२४, रा. सावेवाडी, लातूर) हे एका रुग्णालयासमोर थांबले होते. दरम्यान, दुचाकीवरुन जोरजोरात हॉर्न वाजवत पाप्या बजगुडे याच्यासह अन्य दोघेजण आले. ‘हॉर्न वाजवू नका’, असे ढेकरे म्हणाले असता, ‘रस्ता तुझ्या बापाचा आहे का?’ असे म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय, फिर्यादीच्या दुचाकीचे नुकसान केले. ही घटना शुक्रवारी लातुरात घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
मारहाणप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
लातूर : ‘तू आमच्या दुकानात का येत नाहीस, दुसऱ्याच्या दुकानात का जाताेस’ असे म्हणून एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना लातुरात घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पद्माकर नारायण फटके (२४, रा. म्हाडा कॉलनी, लातूर) यांच्या भावाला ‘तू आमच्या दुकानात का येत नाहीस?’ असे म्हणून शिवीगाळ करत शुक्रवारी मारहाण करण्यात आली. तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत विवेकानंद चौक पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.