उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथील ग्रामदैवत दत्तात्रयांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि मोठी यात्रा भरते. त्यात महिला आणि पुरुषांच्या जंगी कुस्त्या होतात. यानिमित्त गावातील, परिसरातील ग्रामस्थ तसेच पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात कामानिमित्त आणि नोकरीनिमित्त स्थायिक झालेले ग्रामस्थ उपस्थिती लावतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा वार्षिकोत्सव फक्त धार्मिक विधी पार पाडून साजरी करण्याचे ठरले आहे. याबाबत सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन ठराव घेण्यात आला. या बैठकीला श्री दत्त प्रासादिक हनुमान मंदिर कमिटीचे अध्यक्ष नरसिंग डब्बेटवार, उपाध्यक्ष ॲड. प्रमोद बिरादार, सचिव सूर्यकांत हारनाळे, सहसचिव बाबूराव हारनाळे आदी उपस्थित होते. हा धार्मिक सोहळा साजरा करताना भाविकांनी मास्क लावून सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा होणार असून, मोठे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रयांची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST