जळकोट : कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. सोमवारी येथील स्वस्त धान्य दुकानांवर लाभार्थ्यांनी धान्य घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सुरळीत वाटपासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला.
कोरोनाच्या संकटामुळे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लॉकडाऊन करण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा अशी भ्रांत निर्माण झाली आहे. राज्य शासनाने गोरगरिब लाभार्थ्यांना अल्प दरात धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, लाभार्थ्यांनी शहरातील रेशन दुकानावर सोमवारी धान्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
सध्या मे महिना सुरू असल्याने कडक उन्हं जाणवत आहे. अशा परिस्थितीत शहरातील लाभार्थ्यांनी भर उन्हात धान्य खरेदीसाठी रांगा लावल्या होत्या. सुरुवातीस गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्स राखला जात नव्हता शिवाय, गोंधळ निर्माण होत होता. ही गर्दी पाहून जळकोट ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोंडारे यांनी तत्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून फिजिकल डिस्टन्स राखण्यास सांगितले. त्यामुळे रांग लागली होती.
किराणा मालाचे भाव वाढले...
लॉकडाऊनचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी प्रत्येक धान्य, तेल, साखरेचे भाव काही प्रमाणात वाढविले आहेत. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी, नागरिक रेशन दुकानांकडे वळले आहेत. भरउन्हात रांगेत थांबून धान्य खरेदी करत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दरवाढ करणाऱ्या व्यापा-यांना सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.