बँकांच्या उदासीनतेमुळे महामंडळाचे कर्ज प्रस्ताव रखडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:18 AM2021-04-13T04:18:17+5:302021-04-13T04:18:17+5:30

लातूर : मराठा समाजातील होतकरू तरुणांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करता यावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज ...

Corporation's loan proposal stalled due to indifference of banks! | बँकांच्या उदासीनतेमुळे महामंडळाचे कर्ज प्रस्ताव रखडले !

बँकांच्या उदासीनतेमुळे महामंडळाचे कर्ज प्रस्ताव रखडले !

Next

लातूर : मराठा समाजातील होतकरू तरुणांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करता यावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज योजना राबविल्या जातात. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ५१ जणांनी कर्जासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी ६१४ जणांना कर्ज मिळाले असून, राष्ट्रीयीकृत बँकांच्या उदासीनतेमुळे १ हजार लाभार्थी कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे अर्जदारांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करता यावा, यासाठी व्याज परतावा योजना राबविली जाते. त्याअंतर्गत महामंडळाकडे ३ हजार ५१ तरुणांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. यापैकी १ हजार ६१४ जणांना महामंडळाच्या वतीने पूर्वसंमती देण्यात आली आहे, तर ६१४ जणांना ४३ कोटी ५९ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यापैकी ४३९ लाभार्थ्यांना २ कोटी ४ लाख रुपयांचा व्याज परतावाही देण्यात आला आहे. दोन खासगी फायनान्स कंपन्यांनी महामंडळासोबत कर्जपुरवठा करण्यासाठी करार केला आहे. जिल्ह्यात जवळपास १ हजार प्रस्ताव बँकांकडे प्रलंबित आहेत. सदरील प्रस्ताव दाखल करणारे तरुण बँकाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. व्याज परतावा योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या कर्जाचे व्याज महामंडळाच्या वतीने भरले जाते. यासाठी बँकांना महामंडळाच्या वतीने हमी दिली जात आहे. मात्र, तरीही बँकांचे याकडे दुर्लक्ष आहे. परिणामी, व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना कर्जापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

४३९ जणांना मिळाला व्याज परतावा...

महामंडळांतर्गत आतापर्यंत केवळ ६१४ जणांना कर्ज मिळाले आहे. यापैकी ४३९ लाभार्थ्यांना २ कोटी ४ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळाला आहे. महामंडळाकडे लातूर जिल्ह्यातील ३ हजार ५१ जणांचे प्रस्ताव दाखल आहेत. १ हजार ६१४ जणांना महामंडळाच्या वतीने पूर्वसंमती देण्यात आली आहे. कर्ज प्रस्तावांना बँकांकडून कर्ज पुरवठा होत नसल्याने अर्जदारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

प्रलंबित प्रस्तावासाठी बँकांकडे पाठपुरावा...

महामंडळाने पूर्वसंमती दिलेल्या कर्ज प्रस्तावांना बँकांनी कर्जपुरवठा करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पूर्तता असल्यानेच महामंडळाने परवानगी दिलेली असते. त्यामुळे बँकांकडे प्रलंबित असलेल्या कर्ज प्रस्तावासाठी जिल्हा कार्यालयाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला जात असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Corporation's loan proposal stalled due to indifference of banks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.