लातूर : जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा रुग्ण आढळला नसला तरी आरोग्य विभाग सतर्क झाला असून, चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्याचबरोबर सतर्कतेचा भाग म्हणून आरोग्य विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्यावतीने तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची पडताळणी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने घटत आहे. सध्या केवळ २५६ रुग्ण उपचाराधिन आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत घट होत आहे. जवळपास दोन हजार चाचण्यांमध्ये २५ ते ३०च्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्के आहे. तरीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून, चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे.
जिल्ह्यात दररोज दोन हजार चाचण्या
जिल्ह्यात सध्या सर्दी, ताप, खोकला असे व्हायरल आजार असलेल्या रुग्णांची संख्या नगण्य झाली असली तरी आरोग्य विभागाने दररोज दीड ते दोन हजार कोरोना चाचण्या करण्याचे नियोजन केले आहे.
रॅपिड अँटिजन चाचणी आणि आरटीपीसीआर या दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जात आहेत. दोन्हीही चाचण्या मिळून दीड-दोन हजारांच्या आसपास तपासणीची संख्या जात आहे.
सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांनी अंगावर आजार काढू नये, तत्काळ उपचार घ्यावेत, या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे.
आरोग्य विभागाकडून अशी घेतली जातेय खबरदारी
राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क झाला असून, चाचण्या वाढविण्याबरोबरच कोरोना नियमांचे अनुपालन करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे.
नियमित मास्क, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळण्यासंदर्भात आरोग्य विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सूचना केल्या जात आहेत. नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रस्तुत बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने चाचण्यांवर भर दिला असून, कोरोना नियमांच्या अनुपालनासाठी कडक पावले उचलण्याविषयी सुचित केले आहे.