राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील वृंदावन मंगल कार्यालयात शुक्रवारी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा पार पडली. या वेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हातात माईक घेऊन कार्यकर्त्यांना मास्क लावण्याची सूचना केली.
प्रदेशाध्यक्षांसमोरच गटबाजी चव्हाट्यावर...
कार्यक्रमादरम्यान पदाधिकाऱ्यांचे मनोगत ऐकून घेताना जुन्या आणि नव्याच्या कारणावरून दोन गटांत वाद सुरू झाला. याशिवाय, आम्ही किती वर्षांपासून पक्षात आहोत, आम्ही किती निष्ठावंत आहोत, असे सांगत एकमेकांचे उणे-दुणे काढण्यास सुरुवात केली. तू तू-मैं मैं सुरू झाल्याने हे प्रकरण व्यासपीठापर्यंत पोहोचले. हा वाद पाहून अखेर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. कार्यकर्त्यांच्या संवाद यात्रेतच नेत्यांसमोर गटबाजीचे प्रदर्शन झाले.