लातूर : एकिकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरण मोहिमेस वेग आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसह आरोग्य कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर हे लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ६८ हजार ३३ जणांना लसीकरण झाले आहे. दरम्यान, शासनाकडून को-व्हॅक्सिन या नवीन लसीचा पुरवठा करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने दिवसेंदिवस नियम अधिक कडक केले जात आहेत. त्याचबरोबर विनामास्क फिरू नका. फिजिकल डिस्टन्स राखा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, वारंवार हात स्वच्छ धुवा, असे आवाहन करण्यात येत आहे.
शासनाकडून सुरुवातीस कोविशिल्डच्या लसीचा पुरवठा करण्यात आला. त्याच्या लसीकरणास १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. सुरुवातीस आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाइन वर्करला लसीकरण करण्यास सुरुवात झाली. तद्नंतर ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटांतील दुर्धर आजारी व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागास आतापर्यंत शासनाकडून कोविशिल्डच्या ८२ हजार लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आता को-व्हॅक्सिन लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजार आणि दुसऱ्या टप्प्यात २५ हजार लसींचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे यांनी दिली.
दरम्यान, को-व्हॅक्सिन ही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेंतर्गत नोंदणीकृत व्यक्तींना दिली जात आहे. लवकरच ती उदगीर येथेही उपलब्ध केली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने ग्रामीण भागातील मोठ्या शहरात को-व्हॅक्सिन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.