लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. गृहिणी घरातील सदस्यांना सकस व पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पालेभाज्या, कडधान्ये, दुधाचे पदार्थ बनविण्यावर भर देत असल्याचे चित्र घरोघरी पाहावयास मिळत आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. सर्वच वयोगटांतील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. प्रत्येक व्यक्ती आरोग्याकडे लक्ष देत असून, गृहिणीही कुटुंबातील सदस्यांना सकस व पौष्टिक आहार देण्यावर भर देत आहेत. कोरोनापूर्वी तळलेल्या तसेच चटपटीत पदार्थांवर अधिक भर असायचा. मात्र त्यामध्ये आता घट झाली असल्याचे चित्र आहे. आहारात डाळी, भाज्यांचा समावेश केला असल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.
कच्च्या भाज्या, कडधान्ये
१. तंतुमय पदार्थ रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे. पचनक्रिया याशिवाय सुरळीत होऊ शकत नाही. दरम्यान, कोशिंबीर, कच्च्या भाज्यांचे ज्यूस, मोड आलेल्या कडधान्यांचा वापर केला जात आहे.
२. मटकी, वाटाणे, हरभरे असे पदार्थही आहारात वापरले जात आहेत. या आहारामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबर पचनक्रियाही चांगली राहते.
३. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या आहारात व्हिटॅमिन सी, लिंबू, आवळा, पालेभाज्या, फळे, डाळी, उसळ, पनीर, दूध, अंडी, चिकन, मटण, सोयाबीनच्या पदार्थांचा जेवणात समावेश व्हावा.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच. शरीराला ऊर्जा मिळावी, यासाठी वाटाणे, हरभरा, शेंगदाणे आणि मटकीचाही वापर करायला हवा.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू, आवळा, फळे, डाळी, उसळ, पनीर, दूध, अंडी, चिकन, मटण यांचा रोजच्या आहारात समावेश असल्यास प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते.
मेथी, पालक, शेपू, चुका अशा भाज्यांबरोबर ऋतूनुसार बाजारात उपलब्ध फळांचा आहारात समावेश असणे गरजेचे असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले.
फास्टफूडवर अघोषित बंदी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हॉटेल बंद होते. त्यामुळे पिझ्झा, बर्गर, समोसे, आदी चटपटीत पदार्थांसह तळलेले पदार्थ खाण्यावर बंधने आली आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेकजण आपल्या मुलांना फास्ट फूडपासून दूर ठेवत असल्याचे गृहिणींनी सांगितले.
गृहिणी म्हणतात...
कोरोनामुळे सर्वांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. आहाराच्या पद्धतीही बदलल्या आहेत. प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या घटकांवर अधिक भर दिला जात आहे. आहाराचे महत्त्व लक्षात आले असून, कडधान्यांचा वापर केला जात आहे. तसेच सोयाबीनच्या पदार्थांचाही वापर करतो.
- आशा कांबळे, गृहिणी
मुलांना तळलेले पदार्थ आवडतात. मात्र तेलकट असल्याने खोकल्याचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून तळलेले पदार्थ देणे बंद केले आहे. मुलांना वाटाणे, मटकी, हरभरा यांचा आहार दिला जात असल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.
- शुभांगी साळुंके, गृहिणी
सध्या तेल कमी वापरून पालेभाज्या, मोड आलेले धान्य, पनीर असे पदार्थ बनविले जात आहेत. तेलकट पदार्थ खाणे कमी केले असून, प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आहारावर अधिक भर दिला जात आहे. कोरोनामुळे प्रत्येकाच्या आहारात बदल झाला आहे.
- राणी ढोले, गृहिणी