लातूर : औसा शहरात दाेन ठिकाणाहून बांधकाम साहित्याची चाेरी करण्यात आल्याची घटना घडली हाेती. याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. या घटनेतील दाेघांना पाेलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ३ लाख ९० हजारांचे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, दाेघांनाही औसा न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावण्यात आली.
पाेलिसांनी सांगितले, ३१ मे राेजी औसा शहरातील उटगे मैदान येथून अब्दुल गणी साहेबलाल यांचे ९० लाेखंडी पाईप, १० लाेखंडी स्पॅन असे २ लाख ४५ हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चाेरट्यांनी पळवले हाेते. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात अब्दुल गणी यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तर आठवड्यानंतर आलमला मार्गावरील तानाजी मुकिंदा जाधव यांच्या ७६ लाेखंडी प्लेटस्, हाश्मी चाैकातून ४३ लाेखंडी प्लेट, सात लाेखंडी पाईप आणि चार स्पॅन असा एकूण १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल चाेरट्यांनी पळवला. ही घटना ७ जून राेजी घडली हाेती. या चाेरीचा तपास करत असताना, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने औसा तालुक्यातील टेंबी येथील शादुल शमशाेद्दीन मुलानी (३५) आणि इस्माईल आयुब सय्यद (२६) या दाेघांना औसा पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची अधिक चाैकशी केली असता, चाेरीतील ३ लाख ९० हजारांचा मुद्देमालही हाती लागला. या दाेघांनाही औसा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाेलीस काेठडी सुनावली आहे, असे औशाचे पाेलीस निरीक्षक एस. यू़. पटवारी यांनी सांगितले.