लातूर : गत खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांनी पीकविमा कंपनीकडे ऑनलाईन, लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, बहुतांश शेतक-यांच्या तक्रारींची पीकविमा कंपनीने दखलही घेतली नसल्याचे दिसून येत आहे, तर जवळपास ८ हजार शेतक-यांचे अर्ज अपात्र ठरविले. केवळ १ लाख ८ हजार शेतक-यांना ८८ कोटी २६ लाख मंजूर करुन त्याचे वाटप केले जात आहे.
गत खरीप हंगामात वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाल्याने चांगले शेती उत्पादन मिळेल, अशी आशा शेतक-यांना होती. मात्र, मुग, उडीद तसेच सोयाबीन काढणीच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. तत्पूर्वी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जिल्ह्यातील १० लाख ४४ हजार शेतक-यांनी अर्ज करुन ४९ कोटी ७४ लाखांचा विमा हप्ता भरला होता. दरम्यान, नुकसानभरपाई मिळण्यासाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन तक्रारी दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यामुळे पीकविमा भरलेल्या आणि नुकसानग्रस्त शेतक-यांनी आपल्या सोयीनुसार ग्रामसेवक, तलाठी तसेच पीकविमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे शेतक-यांचे डोळे नुकसानभरपाईच्या मदतीकडे लागले. परंतु, वास्तवात पीकविमा कंपनीने १ लाख १६ हजार शेतक-यांचे अर्ज आल्याचे सांगून त्यातील ८ हजार शेतक-यांचे अर्ज अपात्र ठरविले.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान अनुषंगाने जिल्ह्यातील केवळ १ लाख ८ हजार शेतक-यांना ८८ कोटी २६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यापोटी आतापर्यंत ७६ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. वास्तविक पहाता, जिल्ह्यातील १० लाख ४४ हजारपैकी केवळ १ लाख ८ हजार शेतक-यांनाच मदत मिळत असल्याने उर्वरित तक्रारी अर्ज गायब झाले कुठे असा सवाल शेतक-यांतून व्यक्त होत आहे.
एकाला १२ हजार तर दुस-याला ३ हजार...
नुकसानीच्या तक्रारीनुसार पंचनामा करण्यात आला. मात्र, एकाच गटातील शेतक-याला नुकसानभरपाई पोटी १२ हजार तर दुस-या शेतक-याला ३ हजार रुपये मदत पीकविमा कंपनीकडून देण्यात आली आहे. वास्तविक पहाता, किमान एकाच गटात समान क्षेत्रावर पेरणी केलेल्या शेतक-यांना समान नुकसान भरपाई मिळायला हवी की नाही, असा सवाल शेतक-यांतून व्यक्त होत आहे.
५० ते ६० तक्रारी दाखल...
स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसाअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८ हजार शेतक-यांना ८८ कोटी २६ लाख मंजूर झाले. आतापर्यंत ७६ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. असमान पैश्याबाबत आतापर्यंत ५० ते ६० शेतक-यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांना समजावून सांगण्यात येत आहे, असे पीकविमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक संतोष भोसले यांनी सांगितले.
अद्यापही मदत मिळाली नाही...
तक्रारीनुसार पंचनामा झाला. दरम्यान, आम्ही कृषी विभागासह प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु, अद्यापही नुकसानभरपाईपोटी मदत मिळाली नाही. त्यामुळे आता तक्रार करावी कुणाकडे असा प्रश्न असल्याचे कव्हा येथील शेतकरी संतोष सुलगुडले यांनी सांगितले.