लातूर : कृषी धोरण २०२० अंतर्गत चालू वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये. तसेच या धोरणाअंतर्गत कृषी पंपाची थकबाकी रक्कम गोठविण्यात आली आहे. या रकमेवर कुठलेही व्याज किंवा विलंब आकार लागणार नाही. सदर रक्कम पुढील तीन वर्षे भरण्याची सुविधा कृषीपंप धारकांना देण्यात आली आहे.
याबाबतचे परिपत्रक महावितरणने १६ फेब्रुवारी रोजी काढले आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांतून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने परित्रक जारी केले आहे. कृषी धोरण २०२० अंतर्गत चालू वीज बिल भरणा न करणाऱ्या वीज ग्राहकांना कलम ५६ नुसार वीज पुरवठा खंडित करण्याबाबतच्या नोटिसा बजावणे आवश्यक आहे. त्यानंतरच संबंधित वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे धोरण आहे. थकबाकी सप्टेंबर २०२० च्या वीज बिलानुसार गोठविण्यात आली आहे. शिवाय, या रकमेवर व्याज किंवा विलंब आकारला जाणार नाही. ग्राहकांना सवलतीनुसार तीन वर्षे या रकमेचा भरणा करता येणार आहे. सप्टेंबर २०२० च्या बिलातील गोठविण्यात आलेल्या थकबाकीकरिता कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, असे निर्देश महावितरणने दिले आहेत.
तक्रारींचे निवारण करावेवीज पुरवठा गोठविलेल्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये तसेच कृषी पंप वीज ग्राहकांची कोणतीही तक्रार असल्यास त्या तक्रारींचे निवारण करून थकबाकी पुनर्निधारित करावी, सुधारित थकबाकी भरण्याकरिता धोरणांतर्गत कृषी ग्राहकांना सवलतीबाबत अवगत करावे, कृषी धोरणाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ कसा देता येईल, याबाबत माहिती द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.