येथील प्रशासकीय इमारत व तालुक्यातील विकासकामांसंदर्भात बुधवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन गावांच्या मागणीनुसार तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करावेत. जल मिशनच्या आराखड्यात प्रस्ताव समाविष्ट करावेत, अशा सूचना करून आमदार पवार म्हणाले, मतदारसंघातील सर्व मोठ्या पाणीपुरवठा योजना सौरऊर्जा संचलित करण्याचे तसेच सर्व गावांतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र रोहित्र बसवून घेण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्पासाठी जागा मिळत नसेल तर पाण्यावर प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी करून प्रस्ताव दाखल करावेत.
किल्लारी व ३० खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाईप बदलण्यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. या योजनेचे २०१७ पूर्वीचे वीज बिल शासन भरणार आहे. त्यामुळे महावितरणने पूर्वीचे व नंतरचे वीज बिल वेगळे करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे द्यावे. मातोळा योजनेचे वीज बिल भरण्यात आले असून महावितरणने तात्काळ विद्युत पुरवठा सुरू करावा. खरोसा पाणीपुरवठा योजनेची आवश्यक ती दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, असेही आमदार अभिमन्यू पवार म्हणाले.