आपल्या पाल्यांना अभ्यासाची गोडी लागावी, मित्रांची ओळख व्हावी, बाराखडी, अंकगणिताची ओळख व्हावी, यासाठी अनेक पालक आपल्या बालकांना नर्सरीच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. त्यानंतर केजी, पहिली, दुसरी या वर्गांचा प्रवास सुरू होतो. लातूर शहरात जवळपास १६५ केजी आणि नर्सरीच्या शाळा आहेत. यामध्ये ११ हजार ५०० हून अधिक विद्यार्थी प्रवेशित असतात. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे या शाळा बंदच आहेत. सद्य:परिस्थितीत शाळा सुरू करण्याच्या कोणत्याच हालचाली होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षातही नर्सरी आणि केजीच्या मुलांना घरीच राहावे लागते की काय, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.
शहरातील नर्सरी टू केजी शाळा
शाळासंख्या विद्यार्थीसंख्या
२०१८-१९ ८५५०
२०१९-२० ९२५०
२०२०-२१ ११५००
मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम... पालकांनी काळजी घ्यावी...
कोरोनामुळे लहान मुले घरातच आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घरच्या घरीच अभ्यास करून घ्यावा, मुलांच्या आवडीनिवडी पूर्ण कराव्यात. जास्तीतजास्त वेळ मुलांसाठी द्यावा. - डॉ. मिलिंद पोतदार, मानसोपचारतज्ञ्ज
वर्षभर कुलूप; यंदा?
गेल्या दीड वर्षांपासून नर्सरी आणि केजीच्या शाळा बंदच आहेत. यावर्षीही वाढत्या रुग्णसंख्येमुळे नर्सरीचे वर्ग सुरू होतील का, याबाबत शंका आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. - रमेश बिराजदार, संस्थाचालक
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. लहान मुलांना अध्ययनाची गोडी लागावी, यासाठी नर्सरी आणि केजीचे वर्ग असतात. मात्र, मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी लहान मुलांच्या शाळा बंद राहतील, अशीच शक्यता आहे. - यांगेश मगीरवार, शाळाचालक
लहान मुलांचा ऑनलाइन अभ्यासही घेऊ शकत नाही. त्यामुळे शाळा बंद असल्याने पालकांनीच घरच्या घरी अभ्यास घ्यावा. यावर्षी शाळा सुरू होतील की नाही, याबाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही. - श्रीकृष्णा लाटे, शाळाचालक
पालकही परेशान...
नर्सरी आणि केजीच्या शाळा बंद असल्याने मुलांचा घरीच अभ्यास घ्यावा लागत आहे. सतत घरीच असल्याने मुलांचा स्वभाव चिडचिडा होत आहे. शाळा कधी सुरू होतील, याची प्रतीक्षा आहे. - योगेश्वरी चामले, पालक
घरीच अभ्यास घेत आहोत. शाळा बंद असल्याने मुले केवळ टीव्ही आणि मोबाइलवर असतात. शाळा सुरू असत्या, तर किमान अभ्यास तरी करावा लागला असता. मात्र, सध्या अभ्यासच बंद आहे. - दीपा ओवांडकर, पालक
शाळा लवकर सुरू होण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे मुलांचा घरीच अभ्यास घेत आहोत. अभ्यास, टीव्ही, मित्रांसोबत खेळणे यामध्ये मुलांना समाधान मिळत आहे. - सचिन पेन्सलवार, पालक