तालुक्यातील तीर्थ, किनी कदू व सावरगाव थोट येथील शेतकऱ्यांची शेती मोघा साठवण तलावाजवळ आहे. या साठवण तलाव परिसरात थोडगा ३३ केव्हीच्या फिडरवरून वीजपुरवठा होतो. मात्र, या फिडरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. सतत वीज गुल होत असल्याने शेतकऱ्यांनी चौकशी केली असता तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वारंवार ‘महावितरण’चे उपअभियंता प्रदीप काळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली व दुरुस्तीची मागणी केली. परंतु, ‘महावितरण’कडून केवळ आश्वासनेच दिली जात आहेत. ६ महिन्यांपासून पाठपुरावा करूनही समस्या सुटत नसल्याने परिसरातही १०० शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयास उपोषणाची परवानगी मागितली होती.
दरम्यान, आमदार बाबासाहेब पाटील यांनी सदरील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन तत्काळ कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क करून थोडगा येथे ५०० मीटरची नवीन वाहिनी टाकण्याचा जो प्रस्ताव आहे, त्याला गती देण्याच्या सूचना केल्या. येत्या काही दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत होणार असल्याचे आ. बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. या उपोषणाच्या निवेदनावर नितीन माने, रामचंद्र पेड, माधव पेड, अर्जुन पेड, राजेश्वर पाटील, रामचंद्र कुदळे, महेश पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.