जळकोट ते बा-हाळी मार्गे रावणकोळा रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणीचे निवदेन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दस्तगीर घोणसे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांना दिले होते. दरम्यान, यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सदरील रस्ता मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्राद्वारे पाठविले आहे.
बाऱ्हाळीहून जळकोटला ये-जा करण्यासाठी सध्या मुखेडमार्गे ५० किमी अंतर पडते. जर हा रस्ता रावणकोळा मार्गे झाला तर हे अंतर केवळ २० किमीचे आहे. या नवीन मार्गामुळे ३० किमीचे अंतर कमी होणार आहे. त्याचा व्यापारी, वाहनधारक, नागरिकांना लाभ होणार आहे. त्यामुळे वेळ व पैश्याची बचत होणार आहे. राज्यमंत्र्यानी ग्रामविकास मंत्र्याकडे मागणी केल्याने या भागातील नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत.