देवणी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली होती. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील काही गावे सीलही करण्यात आली होती. तसेच जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांची महसूल, आरोग्य, पंचायत समिती, पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी केली. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यास मदत झाली. आरोग्य विभागाने चाचण्यांचे प्रमाण वाढविले होते.
तालुक्यात एकूण ५४ गावे असून सर्वच गावांत कोरोनाचा संसर्ग झाला होता. तालुक्यात रविवारपर्यंत १ हजार ५३५ कोरोना बाधितांची नोंद झाली असून त्यापैकी १ हजार ४२२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनामुळे एकूण ३९ जण दगावले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्याने तालुक्यातील ५४ पैकी २६ गावांत एकही रुग्ण नसल्याने ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. येथील ८० रुग्ण क्षमतेच्या कोविड केअर सेंटरमध्ये सध्या एकच रुग्ण उपचार घेत आहे. तालुक्यात एकूण ७४ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी देवणी शहरात ११ आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबरोबरच आरोग्य विभागाने आतापर्यंत १० हजार ८०९ जणांना कोविड लस दिली आहे. नागरिकांकडून शासन नियमांचे पालन करण्यात येत असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे.
नियमांचे पालन करावे...
नागरिकांनी नियमांचे पालन करावे. कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. घराबाहेर जाताना चेहऱ्यास मास्क लावावा. फिजिकल डिस्टन्स राखावा. गर्दीत जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.