कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक राहिले. दुसऱ्या लाटेत लहान मुलांपासून तर तरुणांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. प्रत्येक वयोगटातील रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आल्याचे दुसऱ्या लाटेत पाहायला मिळाले. कोरोनाला सामोरे जाणाऱ्या बालकांनी उपचार घेऊन कोरोनावर मात केली, मात्र, बरे झाल्यानंतरही पोस्ट कोविडमध्ये अनेक आजारांना सामोरे जाण्याची वेळ अनेक बालकांवर ओढावत आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर मुलांना ‘एमएसआयसी’चा धोका पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक रुग्णालयांत अशा बालकांवर उपचार सुरू आहेत. पण कोरोनातून बरे झालेल्या एक ते दोन टक्के बालकांनाच हा धोका आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
---
तत्काळ उपचार गरजेचे...
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढले. कुटुंबातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला त्यामुळे लहान मुलेही बाधित आढळली आहेत. त्यामुळे लक्षणे दिसतात तत्काळ उपचार गरजेचे आहेत.
ही घ्या काळजी
१. मुलांना कोरोना होणारच नाही, यादृष्टीने पालकांनी स्वत:बरोबर लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाणे टाळावे. पालकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
२. लहान मुलांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच उपचाराने आजार लवकर बरा होण्यास मदत होते.
३) मुलांना जंक फूडऐवजी सकस आहार दिला पाहिजे. शक्य असेल तर मुलेही व्यायाम करतील, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असे तज्ज्ञांनी म्हटले.
लक्षणे दिसताच उपचार गरजेचे...
कोरोनाच्या काळात लहान बालकांनाही संसर्ग झालेला आहे. त्यामुळे एमएसआयसी आजाराची लक्षणे काही बालकांमध्ये आढळत आहेत. पालकांनी योग्य ती खबरदारी घेत मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. कोणतीही लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. वर्धमान उदगीरकर, बालरोगतज्ज्ञ, लातूर.
एमएसआयसी
अशी आहेत लक्षणे
-मुलांना खूप ताप येणे, पाच दिवसांपर्यंत कमी न होणे
-मुलांचे डोळे लाल होणे
-त्वचेवर रॅसेस पडणे
-मळमळ, उलट्या होणे
-मुलांच्या सतत पाेटात दुखणे