लातूर : बालकाचे अपहरण करणाऱ्या तिघा आराेपींना कासार शिरसी पाेलिसांनी उमरगा (जि. धाराशिव) येथून अटक केली असून, अपहृत बालकाची सुखरूप सुटका केली आहे.
पाेलिसांनी सांगितले की, कासार शिरसी ते निलंगा मार्गावर असलेल्या करीबसवेश्वर विद्यालयासमाेरून सकाळी ९ वाजता एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची तक्रार पाेलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. सुरेश सीताराम बंडगर, अजय तानाजी सूर्यवंशी याच्यासह एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. कासार शिरसी, ता. निलंगा) याने अपहरण करून कारमधून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याबाबत कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, निलंगा उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल धुमे यांनी अपहृत बालकाचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कासार शिरसी ठाण्याचे सपोनि प्रवीण राठोड यांच्या पथकाने पुणे, सोलापूर, कल्याण (जि. ठाणे) येथे आराेपींचा शाेध घेतला.
आराेपी सतत ठिकाण बदलत हाेते. अपहृत बालक त्यांच्यासोबत हाेता. त्यासाठी या आरोपींना लवकर ताब्यात घेण्याची गरज हाेती. पाेलिस पथकाने उमरगा (जि. धाराशिव) येथून सकाळी ६ वाजता सुरेश बंडगर याला माेठ्या शिताफीने ताब्यात घेतले. अपहृत बालकाची सुखरूप सुटका केली. शिवाय, त्याच्यासोबत असलेले इतर दाेघे साथीदार पळाले हाेते. त्यांनाही कासार शिरसी येथून ताब्यात घेतले. आराेपींची कसून चाैकशी केली असता, आरोपींनी सूडबुद्धीने बालकाचे अपहरण केल्याचे समाेर आले. गुन्ह्यात वापरलेली कार पाेलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई सपोनि. प्रवीण राठोड, सायबर सेलचे पोनि. बबिता वाकडकर, पोलिस अमलदार तपसे, वरवटे, गायकवाड, नागमोडे, मस्के, डावरगावे, चव्हाण, शैलेश सुडे यांच्या पथकाने केली.