चाकूर : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी पसरत आहे. नगरपंचायतीकडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, शाळेच्या मैदानास उकिरड्याचे स्वरुप आले आहे. दरम्यान, रात्रीच्यावेळी मद्यपींसाठी हे आश्रयस्थान बनले आहे.
चाकूर नगरपंचायत कार्यालयासमोर जिल्हा परिषद शाळेची इमारत आहे. शाळेचे मोठे मैदान आहे. या परिसरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन होत आहे. विशेष म्हणजे, नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापनावर लाखों रूपये खर्च करीत आहे. मात्र, येथील साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. रात्री १०- ११ वा. नंतर काही विघ्नसंतोषी शाळेच्या मैदानावर येऊन मद्यप्राशन करीत असतात. मद्याच्या रिकाम्या बाटल्या तिथेच टाकून देतात. मद्याच्या नशेत तर्रर्र झाले वाद करीत गाेंधळ घालित असतात. त्याचा परिसरातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
काही विघ्नसंतोषी रात्रीच्या वेळी या परिसरात पत्त्यांचा डाव मांडून बसतात. पत्ते खेळून झाले की, त्याच परिसरात पत्ते फेकतात. शाळेला सुट्टी असलेल्या दिवशी तर मद्यपी, जुगारींसाठी आनंदाचा दिवसच ठरत आहे. अनेकदा शाळेच्या दरवाज्यासमोर वर्गातही घाण टाकली जाते. दुस-या दिवशी शाळा उघडताना तेथील शिक्षकांना प्रथमत: स्वच्छता करावी लागत आहे. येथील या अवैध प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
या मैदानाच्या परिसरात जिल्हा परिषद मुलांची इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची शाळा आहे. बाजूला मुलींची इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची शाळा आहे. विद्यार्थी २४३ तर १२ शिक्षक- शिक्षिका आहेत. जवळच गटसाधन केंद्र आहे. अंगणवाडीही येथे भरते. काही दिवसांपूर्वी गटसाधन केंद्राचे कुलूप तोडण्यात आल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी झेरॉक्सची मशीन पळविली होती. एका महिन्यात कुलूप तोडण्याचे दोनदा प्रकार घडले होते, असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय आलमले यांनी सांगितले.
नागरिकांचा नाहक वावर थांबला पाहिजे...
शाळेच्या मैदानावर घडत असलेल्या प्रकाराबाबत पाेलिसांना माहिती देण्यात आली आहे. मुलांच्या शाळेसमोरील परिसराची नगरपंचायतीकडून नियमित स्वच्छता केली जात नाही. रात्री येथे घडत असलेल्या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे. घाण व दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. विनाकारण नागरिकांचा होणारा वावर थांबला पाहिजे.
- सुनील डोंगरे, मुख्याध्यापक.
विद्यार्थ्यांना त्रास...
चाकूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या मैदानात मुलींची शाळा आहे. दोन गेट बसविण्यात येत असले तरी पोलीस व नगरपंचायतीने त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढला पाहिजे.
- ज्ञानोबा बने, मुख्याध्यापक.
कारवाई करण्यात येईल...
शिक्षकांसह त्या भागातील नागरिकांच्या तोंडी तक्रारी आहेत. या शाळेच्या मैदानावर पत्ते खेळणारे व अन्य लोकांवर पाळत ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- हणमंत आरदवाड, बीट अंमलदार.
चाकूर
शाळेच्या परिसरातील स्वच्छता, साफसफाई ही नियमित करण्यासाठी स्वच्छता विभागाला सूचना देण्यात येतील, असे नगरपंचायतीचे कार्यालयीन प्रमुख बी.व्ही. ठाकूर यांनी सांगितले.
शाळा परिसर, शहरात नेहमी स्वच्छता झाली पाहिजे. शाळेचा परिसरात नेहमी अस्वच्छता असते. संबंधित विभागाने नियमितपणे स्वच्छता करावी, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहर सरचिटणीस अशोक शेळके यांनी दिली.