उदगीर : येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात कारवाॅ फाउंडेशनच्या पुढाकारातून निसर्गरम्य वातावरणात विशाल वृक्षाच्या छायेत कारवाॅ वाचन कट्टा उभारण्यात आला आहे. हा वाचन कट्टा भिंतीविना उघड्यावर असल्याने मॉर्निंग वॉक व सायकलिंगसाठी आलेल्यांची वाचनाची भूक भागवतोय. त्यामुळे हा वाचन कट्टा वाचकांच्या पसंतीस उतरत असून वाचन चळवळीला बळ देणारा अभिनव उपक्रम ठरत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने नवीन पिढी वाचनापासून दुरावली जात आहे. त्यासाठी सामाजिक जाणिवा असलेल्या संस्था व संघटनांनी पुढे येऊन वाचन चळवळीला बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. सार्वजनिक ग्रंथालये, शाळा- महाविद्यालयातील व विद्यापीठ ग्रंथालये यासाठी काम करताना दिसून येतात. परंतु, सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर तर शाळा ग्रंथपालांना विद्यार्थी संख्येची अट असल्याने अर्धवेळ काम करावे लागत आहे. तसेच ग्रंथ खरेदी करण्यासाठीही पुरेसा निधी मिळत नसल्याने वाचकांना योग्य ग्रंथ उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत एक आशेचा किरण घेऊन अनेक सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या कारवाॅ फाउंडेशनच्या पुढाकारातून कारवाॅ वाचन कट्टा हा उपक्रमही प्रभावीपणे राबविला जात आहे. मॉर्निंग वॉक व सायकलिंगसाठी दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात अनेक तरुण येत असल्याने या परिसरातच हा वाचन कट्टा तयार करण्याची अभिनव संकल्पना कारवाॅच्या अदिती पाटील यांना सुचली. या उपक्रमाला मूर्त स्वरुप आले असून नियमितपणे त्याचा वापरही होऊ लागला आहे.
पालिका उभारणार उद्यानात वाचन कट्टा : मुख्याधिकारी...
उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी शनिवारी कारवाॅ फाउंडेशनच्या या वाचन कट्यास भेट देऊन कौतुक केले. निसर्गरम्य वातावरणात वाचनाचा आनंदही घेतला. यावेळी शहरातील विविध ठिकाणच्या उद्यानात ही संकल्पना नगरपालिकेच्या वतीने राबविणार असल्याचे मुख्याधिकारी राठोड यांनी सांगितले. यावेळी कारवाॅ फाउंडेशनच्या ॲड. अदिती पाटील, सुमनताई भारत राठोड, साहित्यिक धनंजय गुडसूरकर, ओमकार गांजूरे, डॉ. मनोहर सूर्यवंशी, अमोल घुमाडे, सुनील भुयारे, संदीप देशमुख, प्रमोद कळोजी, युवराज कांडगीरे आदींची उपस्थिती होती.
वाचन कट्ट्याच्या समृद्धीसाठी पुस्तके भेट द्यावीत...
प्रायोगिक तत्त्वावर कारवाॅ फाउंडेशनच्या वतीने वाचन कट्टा आम्ही निर्माण केला आहे. या कट्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मुख्याधिकारी भारत राठोड यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत नगरपालिकेकडून असा उपक्रम शहरातील उद्यानात राबविणार असल्याचे सांगितल्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली आहे. आपण वाचलेली पुस्तके, मासिके व दिवाळी अंक घरातच न ठेवता, अशा अभिनव प्रकल्पाला भेट द्यावीत, असे आवाहन ॲड. अदिती पाटील यांनी केले.
***